`जग दैवी शक्तीवर चालत नाही, जग पैशावर चालत नाही, जग प्रेम किंवा विश्वासावर चालत नाही तर जग चालतं कल्पनाशक्तीवर.`
BScला असताना शास्त्र आणि मजबूरी म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला फिजिक्स घ्यावं लागलं होत. जेव्हा आम्ही प्रॅक्टिकलला लॅबमध्ये जायचो तेव्हा समोरच अल्बर्ट आईन्स्टाईनचं एक वाक्य नजरेस पडायचं, ` Imagination is greater than knowledge ~ Albert Einstein`. तेव्हा मला वाटायचं बीसी जिथे ज्ञान शिकवलं जातं तिथेच ज्ञानापेक्षा कोणतीतरी शक्ती मोठी आहे असं वाक्य कशी काय भिंतीवर लटकवतात. टिपिकल भारतीय शिक्षणपद्धतीचा एक साचेबद्ध मुलाप्रमाणे मी विचार करत होतो. कल्पनाशक्तीचा दूर दूर वर देखील संबंध न आणता केवळ नॉलेजला महत्त्व देऊन पुस्तकातला डाटा मेंदूत फिट करायचं, हा आमच्या शिक्षणाचा पॅटर्न असतो. आणि ह्याच पॅटर्नच्या नावाने आज आपली शिक्षणपद्धती, विद्यार्थी आणि पालक माती खात आहे. असो. आम्ही खाल्ली पण तुम्ही खाऊ नका इतकंच.
मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघेही आळशी होतो, त्यामुळे दीड-दोन तास पूर्ण प्रॅक्टिकल करून त्यांच्या ॲक्च्युअल रिडिंग काढण्यापेक्षा, एक-दोन रिडिंग काढल्यावर त्यावरच मनातल्या मनात गणिती कांड (ज्याला की आम्ही तेव्हा कल्पनाशक्ती म्हणायचो) करून राहिलेल्या सगळ्या रिडिंग मनाने ठोकून सरांचा शेरा मारून आणायचो आणि एकमेकांना दात दाखवत मोठ्या अभिमानाने बाकीच्या पोरांना सांगायचो की, `आज पण आम्हाला आईन्स्टाईन बाबा पावला`.
तेव्हा मला कल्पनाशक्ती ह्या शब्दाबद्दल काहीही माहीत नव्हतं, पण जगातील इतका महान शास्त्रज्ञ बोलत असेल तर नक्कीच `कल्पना` ह्या शब्दात खूप मोठी `शक्ती` असेल, बस इतकंच त्या वेळी मला कळलं होत. तर कल्पनाशक्ती म्हणजे काय तर आपल्या लायकीच्या बाहेरच्या जगाचं रेखाटन आपल्या मनात करायचं. आपल्या जादुई मेंदूने आपल्याला पाहिजे ते करायचं, पाहिजे तिथे जायचं, आपल्याला पाहिजे ते पहायचं. पण हे सगळं होतं ते आपल्या मेंदूतल्या दुनियेत. जगातील सगळ्यात हिंस्र, सगळ्यात स्वार्थी आणि सगळ्यात हुशार प्राणी म्हणणे मानवप्राणी इतका यशस्वी झाला कारण त्याच्या कल्पनाशक्तीमुळे.
जग दैवी शक्तीवर चालत नाही, जग पैशावर चालत नाही, जग प्रेम किंवा विश्वासावर चालत नाही तर जग कल्पनाशक्तीवर चालतं. आदिमानवाने चाकाचा शोध लावला आणि मानवी आयुष्याला गती दिली. राईट बंधूंनी माणसांना पक्षांचे पंख लावण्याची कल्पना केली आणि विमानाचा शोध लावला. माणसाचा कल हा नेहमी वास्तवाच्या वर्तुळाबाहेरचा विचार करण्याकडे असतो. आणि तो विचार वास्तवात आणण्यासाठी तो आपलं आयुष्य खर्ची घालतो. उदा. आपण लोकांना घरपोच वस्तू देऊन त्याचा वेळ वाचवू शकतो, त्यांना वेळ विकत देऊ शकतो ही कल्पना जेफ बेझोसने १९९८ साली केली आणि अमेझॉनचा जन्म झाला. लोकांना `वेळ विकत देणे` हा काळाच्या खूप पुढचा विचार केल्याने आज जेफ बेझोस जगातील श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत दुसऱ्या क्रमांकावर बसतात. जगातील सगळ्या श्रीमंतांची, यशस्वी लोकांची हीच खासियत आहे. कल्पना करायची, ती वास्तवात आणायची आणि त्या वास्तवात संपूर्ण जगाला खेळवायचं.
आज असलेलं वास्तव हे काल कोणी तरी केलेली कल्पना होती आणि आजच्या वास्तवात कोणी तरी उद्याची कल्पना करत आहे.
©मोरे_गणेश.

1 टिप्पणी:
❤️🙌
टिप्पणी पोस्ट करा