१० सप्टें, २०१८

#वेळ विकत घेतोय.

उद्या तुम्ही रस्त्यावरून नांगडं जरी चालत सुटलात तरी तुमच्याकडे पाहण्यासाठी माणसांना वेळ नसेल. तोच वेळ ब्लॉगच्या माध्यमातून विकत घेण्याचं प्रयत्न. वेळ मिळालं तर नक्की वाचा,

#वेळ विकत घेतोय.

               परवाची संध्याकाळ, बहादुरशेख नाका, ६ वाजताची वेळ.  माझं हाडा–मासांच जीवंत थडगं लालपरीची प्रतीक्षा करत   नाक्यात उभं होत. हा आता थडगंच म्हणायचं; गणिताच्या तीन लेक्चरने कोमेजून गेलेला मेंदू, बॅडमिंटन खेळून लुळे पडलेले हात आणि दिवसभर हिकडे –तिकडे भटक सवारी करून नाक्यात दोन तंगड्यांच्या आधारावर उभं राहिलेलं असं हे मेल्यात जमा असलेले पण जीवंत असं थडगं. कॉलेजमध्ये वळवळेल्या इंटीग्रेशनच्या किड्याला ( integrationचं चिन्ह हे एका किड्याप्रमाणे आहे) घरी जावून शमवायचं होत आणि बहिणीला एका विषयावर वकृत्व देयाच असल्याने घरी लवकर जायचं होत. बसची वेळ झालीच होती, तितक्यात एक भरगच्च भरलेलं वडाप आला. ड्रायव्हर ओळखीचा असल्याने तो मला येण्याची विचारणा करणार हे मला माहीत होत. त्यामुळे ड्रायव्हरला फाट्यावर मारून डोळ्याच्या बाहुल्या व्हॉटसअपमध्ये विलीन केल्या. आणि तसंही बसपास असल्याने १०रूचा खर्च करून वडापणे जाण्यापेक्षा मेलेल्या शरीराला माणसात आणणाऱ्या वडापाव खाण्यास मी प्राधान्य दिलं. मला कुठे माहीत होत की १२रूचा वडापाव खावून आपल्याला पुढच्या आपल्या हक्काच्या एका तासावर पाणी सोडावं लागणार आहे. एक तास होवून गेला होत. एस. टी.  काही आली नाही. अंधार पडत होता. गाडीच्या हेड लाइट्स डोळ्यांना जखमा करत होत्या. आणि अचानक  चेहऱ्यावर एक भलतच हसू आलं. गोरी गोमटी, काळ्या बॉर्डरचा चष्मा, केसांत गोवलेली स्टिक, पुरुषाला लाजवेल असा शर्ट, एकदम स्टॅंडर्ड अशी आमच्या कॉलेजची ललना माझ्या डोळ्यासमोरून भुर्रकन गेली. हा ४५ अंशात माझ्याकडे मान वळवून झलक सुद्धा देवून गेली. भारी होती. आवडली. (आवडणे आणि प्रेम होणे ह्या परस्पर वेगवेगळ्या संकल्पना आहेत). पण तुम्हाला वाटतं तशी कोणतीही लालसा माझ्या हृदयाला धडकली नाही, मेंदूत एकच विचार आलं, ` बेंचो ह्या पोरीच्या बापाप्रमाणे आपल्यालाही आपल्या बापाने गाडी घेऊन दिली असती तर, घेतला असतं ना आपण मागचा एका तास विकत.` हा हा. वेळ विकत घेतला असता. 
             सुख–सुख म्हणजे तरी काय. खूप धडपड करून अमाप पैसा कमवायचा. आणि त्या पैशातून जास्तीत जास्त वेळ विकत घेयाचं. अशी तोडली मोडकी सुखाची व्याख्या होऊ शकते. आजचा जो भारत बंद ज्या पेट्रोल वाढीमुळे झाला होता त्यामुळे मला उद्या रस्त्यावर वाहनांची संख्या कमी नाही दिसणार. कारण सार्वजनिक वाहनांची वाट पाहण्यापेक्षा ८८च पेट्रोल जरी १००वर गेलं तरी माणसं स्वतःच्याच गाडीने जातात. कारण त्यांना वेळ वाचवायचं असतं. वेळ विकत घेयाचं असतं. ATM, बुलेट ट्रेन, 4G मोबाईल, डिजिटल इंडिया, ऑनलाईन शॉपिंग, संदेश वाहनाची विविध साधने ही कशाची लक्षणे आहेत. प्रगतीची तर आहेतच पण त्या पुढे जावून विचार केलात तर ही सगळी वेळ विकत घेण्याची सुद्धा साधने झाली आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आज आई–वडिलांना मुल सांभाळण्यासाठी, घरातील काम करण्यासाठी वेळ नाही म्हणून ते एखाद्या मोलकरणीला थोडे जास्त पैसे देवून आपलं वेळ विकत घेत असतात. आज आपण पाणी लगेच गार होण्यासाठी फ्रीज घेतो, पाणी लगेच गरम करायला गिझर घेतो, अनेक भांड्यात जेवण करण्यात खूप वेळ जातो म्हणून कुकर मध्ये जेवण बनवतो. सगळे जण वेळ विकत घेण्यात गुंतले आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, की एखादा माणूस वेळ विकत देवून जगात सगळ्यात श्रीमंत बनू शकतो. जेफ बेझोस. अमेझॉन ह्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे संस्थापक. जगातील सगळ्यात शक्तिशाली आणि श्रीमंत CEO (१०० अब्ज डॉलर). हा माणूस आपल्याला घरात वस्तू आणून  आपल्याला वेळ विकत देतो (वेळ वाचवतो) आणि आपण त्याच्याकडून वेळ विकत घेतो त्या बदल्यात आपण त्याला पैसे देतो. आता तुम्हाला वाटत असेल वेळ तर आपण पैशाने विकत घेतो तो पैसा वेळेपेक्षा महागडा आहे. पण तस नाही. आपण पैशाला पाहिजे तशी वागणूक देवू शकतो. ( कमवू, गमावू शकतो) पण वेळ आपल्याला तीच्यानुसार वागणूक देते. सगळ्यांना समान. गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि वेळेच्या पुढे कोणाला जातं येत नाही. म्हणून जगात सगळ्यात शक्तिशाली आता आणि उद्याची वेळच असणार आहे. बस फक्त ती विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे. मग तुम्ही काय ठरवलं आहे, येताय ना, ` वेळ विकत घेयाला`.

©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: