१८ मार्च, २०१८

#निर्भयवाला निर्भया बलात्कार.



२०१७ मधल्या गिधाडांच्या पराक्रमाने माखलेले वर्तमानपत्र  येत्या वर्षात तरी काही प्रमाणात कोरे दिसतील या अपेक्षेने, सरत्या वर्षातली शेवटची पोस्ट,  `तुमच्यासाठी`. १६ डिसेंबर 2012. दिल्ली. निर्भया. आज ‘त्या’ घटनेला पाच वर्ष(15 दिवस) पूर्ण झाल्याने `निर्भया`च्या  निमित्ताने उद्याच्या माणसातल्या पशुत्वांना...

#निर्भयवाला निर्भया बलात्कार..

       दिल्ली; देशाच्या राजधानीसोबतच स्त्री/मुलींवर  वस्तूप्रमाणे अधिकार गाजवणाऱ्या भामट्यांचा अड्डा. अश्या जगात रात्रीच्या मिठ्ठ काळोखात एकट्या स्त्रीने वावरणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घेण्यासारखे. तरुण म्हटल्यावर ते वय असतं बागडायचं. नकळत प्रेमात पडायचं. नवीन स्वप्नांना घेऊन फुलायचं. मैत्रीत घट्ट विलीन व्ह्यायाचं.  अशाच तारुण्यावस्थेत `ती` (निर्भया) तरुणी आपल्या आयुष्याला खुमारी देत असणार. मित्रमैत्रीणसमावेत चित्रपटगृहात जायचं, बाल्कनीची तिकीट काढून लोकांच्या डोक्यावर बसल्याचा आनंद लुटायचं, दोन तासाचा भरगच्च चित्रपट पुढ्यात वाढून ठेवला असतानाही पॉपकॉर्नने पोटाची खळगी भरायची आणि आपल्या आवडत्या तारे–तारकांच्या डोळ्यात डोळे घालून महिन्याभराचा विरंगुळा घालवायचं. असं काहीसे मनसुबे आजच्या तरुणाईचे असतात आणि ह्या सगळ्याला ती  तरुणीसुद्धा अपवाद नव्हती. पण महिन्याभराचा विरंगुळा घालवणारा हा चित्रपट आपल्याला आयुष्यभराची विश्रांती देणार आहे ह्या गोष्टीची तिला साधी भनकही नव्हती. चित्रपट पाहून ती आपल्या सख्यासमावेत परतीच्या वाटेला निघाली. गुलाबी थंडी अंगाला बोचत होती, रात्रीचा काळा काळोख डोळ्यांना फाडत होतो. आणि अचानक तिचे डोळे प्रकाशाच्या मंद झोतात लकलकले. चेहऱ्यावर कमालीचं स्मितहास्य उमटलं.  सरकारी लेबल असलेल्या हिरव्या डब्यात एक डोकं, दोन पाय असणारी माणसं ही माणसातच असणार असं समजून ती आणि तिचा मित्र बस मध्ये चढली. जसं जसं गाडी वेग घेत होती तस तस त्यांना घराची आस लागली होती. पण वासनेच्या अधिन झालेल्या बारा डोळ्यांची नजरच त्या कोवळ्या पोरीच्या शरीराची  चिंधड्या–चिंधड्या करत होती. आणि शेवटी झालंच... उमगणारी ती कळी फुलण्याअगोदरच खुंटली गेली.
       आज 5 वर्ष पूर्ण झाली त्या घटनेला. काय झालं? 5 वर्षात कोणती परिवर्तने घडून आली.?  तिला खरचं न्याय मिळाला का हो? आता दुसऱ्याच्या घराला आग लागली की आपल्याला फक्त त्याच्या झळा लागतात पण स्वतःच्या घराला आग लागली तर त्याचे चटके आपल्याला  सहन होत नाही. त्यामुळे तिला झलेल्या वेदना ह्या तिच्या घरच्यांपेक्षा जास्त कोणाला समजणार. काही दिवसापूर्वीच कोपर्डीच्या नराधमांना फाशी झाली. पण फाशी देऊन आजची वेळ  मारता आली हो,  उद्याच्या नग्नतेचं काय? जिथे तासाला दोन–तीन अन्याय  होतात तिथे दोन–तीन वर्षांतून एक न्याय मिळतो. आणि कशावरून आजच्या फाशीमुळे उद्याच्या मुलींच्या/ महिलांच्या जीवाची काशी होणार नाही. ह्यावरून फाशीचा दोरखंडच तोकडा पडतोय की काय अशी भीती निर्माण झालेय आता. आज फेसबुक वर मुलींच्या फोटोला 1K मध्ये लाईक्स मिळतात, केवढा मोठा मान देतो आपण. पण मुलींना सोशल मीडियावर इतका मान मिळून सुद्धा त्या आज रस्त्यावरून एकट्या सन्मानाने फिरू शकत नाही. आज न्यायालयात वकीलसाहेब हे नराधमांच्या बाजूने अशी काही केस लढवत असतात जशी काही त्यांची खुस कधी वसलीच नाही. वांझोटी असल्याप्रमाणे. मोर्चे निघाले पण,  `त्यांच्यातल्या` नराधमाने `आमच्यातल्या` मुलीवर बलात्कार केला हीच भावना प्रकर्षाने जाणवली. लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारे काही बोलघेवडे नेते मुलींना तोकडे कपडे घालण्यास मनाई करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, मात्र मुलांच्या विरुध्द बोलण्यास त्यांची जीभ घसरत नाही. मुलीला जन्माला घातल्यावर मोठ्या जिगरिने तिला सांभाळायचं आणि अचानक जिवंतपणीच तिला पायदळी तुडवायचं आणि ती तुडवली गेली की तिच्या  नावाने आसवं गालायची ही नवी मानवता आहे. गेट वे ऑफ इंडिया, इंडिया गेट येथील रात्रीच्या अंधकारात काही दिवस आत्मीयतेने आणि क्रोधाने जळणाऱ्या मेणबत्या हळूहळू शमतात.
       असं आहे स्त्रीचं आयुष्य. स्त्री म्हणजे पुरुषांसाठी उपभोगण्याच एक साधन. स्त्री म्हणजे वधीलधाऱ्यांसाठी  मुलांना जन्मला घालणारी एक मशीन. स्त्री म्हणजे समाज्यासाठी   ईश्वराच्या वरदहस्तेने  मिळालेला एक राबता यंत्रमानव. अशा स्त्रीने बलात्काराप्रसंगी करावं तरी काय. त्या नराधमांवर `हात टाकला` तर आड येते ते संविधानाचे (कायदा) पान आणि `हात दिला` तर आड येते ते नियतीचे (समाज) पान.  पण मला सगळ्या मर्दांना उद्देशुन एकच विचारावं वाटतं,`मर्दगड्यांनो, जर तुम्ही स्त्रीच संरक्षण करण्याच कर्तव्य पार पाडू शकत नसाल  तर तुम्हाला ‎स्त्रीवर अधिकार गाजवण्याचा हक्क तरी कोणी दिला तुम्हाला ? माणसाची निर्मिती कोणी आणि कशी केली हे मला ठाऊक नाही पण ज्याने कोणी केली त्याला स्त्री–पुरुष समानतेच्या तराजुचा समतोल साधता आला नाही इतकं मात्र नक्कीच.
       शोकांतिकेने भरलेल्या ह्या काळजातून, `पुन्हा असं कोणत्याही मुलीच्या निमित्ताने कोणालाही लिहिण्याची संधी मिळू नये` हा एकच आशावाद..!
©मोरे गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: