गेले ३~4 दिवस कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सगळ्यांची पि`पाणी` वाजवत आहे (आणि अर्थातच फटाके काय नेहमी फुटत असतात पण दिवाळीत त्यांचा खास असा हंगाम असतो, जसा आता पावसाचा आहे). वर्षातील चार महिन्यांचे आयुष्य लाभलेला पाऊस जर का चार दिवस सातत्याने पडला की कोकणवासीय (मुंबई वगळता) पावसाला `पाण्यात` ठेवतात; जसे की उर्वरित महा. पाऊस पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवतात त्याच प्रमाणे काही. दोन दिवस सातत्याने काय पाऊस पडला तर गल्लीबोळातल्या शेंबड्या पोरापासून ते बुजूर्गापर्यंत सगळे जण पावसाला शिव्या~शापिंकृत फुलांनी मढवलेला हार चढवतात आणि वर आत्मक्लेशाची तुरतुरी वाजवतात. आम्हाला भातशेतीची कोरड भागवण्यासाठी पाणी सुध्धा पाहिजे आणि घरातून बाहेर पडल्यावर आमच्या पायाला चिखल सुध्धा लागता कामा नये, हे म्हणजे सापही मरो नी लाठीपण तुटू नये या प्रमाणे झाले.
पावसाकडे पाहून नाक मुरडनाऱ्यांनो आपण जर आपल्या वर्षभरातील कुरघोडींचा पर्दाफाश केला तर लक्षात येईल की निसर्ग आपल्याला कसा सांभाळत असेल. वितभर पाऊस पडून ओली झालेली चड्डी सांभाळताना आपली जर नाकीनऊ येत असेल तर वर्षभरात निसर्गाला प्रदूषणाच्या गटारात बुडवल्यावर निसर्गावर कोणती परिस्थिती ओढवत असेल जरा विचार करा.
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा l
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा ll
पाऊस पाडण्यासाठी एकदा पैश्याच्या लोभाला पाऊस बळी पडला आहे पण मोठ्या आलेल्या पावसाला छोटा करण्यासाठी मानव कोणतं आमिष दाखवतो हे पाहणे स्वागतार्ह असेल.
#आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते, आपण समोरच्याच्या राणीला (औद्योगिक विकास) कटवण्याच्या खुशीत स्वतःच्या राजाला (निसर्ग) बंधिस्त करवून घेतो.
©मोरे_गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा